माझ्या निवडणुकीची गोष्ट

माझ्या निवडणुकीची गोष्ट .... माझ्या निवडणुकीची गोष्ट .... वयाच्या एकविसाव्या वर्षी ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याची खुमखुमी मला चक्क निवडणुकीच्या दहा - बारा दिवसाआधी आली . ना पारंपरिक राजकीय वारसा , ना ग्रामीण राजकारणाचा पुरेसा अभ्यास वा अनुभव किंवा मग गाव पातळीवर राजकीय उमेदवारांचा विजय खेचून आणण्यासाठी महत्वाचं मानलं जाते ते ' भावकी ' जाळे किंवा मग मतदारांना विकत घेण्यासाठी आवश्यक तेवढा पैसा . यातलं काहीच हाताशी व मनाशी असण्याची शक्यता दूरवर नव्हती . होती फक्त उदंड इच्छाशक्ती आणि ग्रामविकासाची तळमळ . अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढविलेल्या माझ्या ग्रामपंचायत निवडणूक अनुभवाची ही गोष्ट ! २०२१ च्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रातील जवळपास चौदा हजारांपेक्षा जास्त ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम पार पडला . कोरोनामुळे कार्यकाळ संपूनही निवडणूक न झालेली असंख्य गावं आणि पारंपरिक नेते मंडळी चातकाप्रमाणे गावच्या पारावर अन चावडीवर बसून निवडणुकीची वाट पाहू लागले होते . यात सत्तेबाहेरचे लिंबू - टिंबू अधिकच व्याकूळ . हे चित्र बहुसंख्य गावांमध्ये पाहायला मिळत असतानाच रखडलेल्या गावांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला . निवडणूक यादीतल्या गावांना जिवंतपणा आला . गावातली सार्वजनिक बैठकीची ठिकाणे तरारून जागी झाली . चर्चा अपचर्चांना उधाण आले . निवडणुकीच्या तयारीची लगबग सुरू झाली . ग्रामपंचायत निवडणुकीचा आत्मा म्हणजे गावातील गट - तट . या गटातटाचे म्होरके आपापल्या कार्यकर्त्यांना घेऊन उमेदवार निवडीसाठी , एकगठ्ठा मतांच्या नियोजनासाठी , संभाव्य आरक्षण अन फोडाफोडीच्या राजकारणाची चर्चा करायला एकत्र जमू लागले . मग सुरू झाली रणधुमाळी . बहुसंख्य वाचकांना हे किंचीतही नवं वाटणारं नाही . गेल्या काही वर्षांपासून सामाजिक क्षेत्राशी जोडून असल्या कारणाने एकूणच सामाजिक जाणीवा थोड्याश्या घट्ट झाल्या होत्या . तीन वर्षापूर्वी गोपूज दुष्काळमुक्त करण्याच्या कार्यात बऱ्यापैकी गाव धुंडाळलं होतं . पाण्याइतकेच किंवा त्याहीपेक्षा गहन व ज्वलंत गावातले प्रश्न जवळून पाहिले होते . पाण्याचा दुष्काळ ते शेती , जनावरं आणि माणसांची परवड हे कनेक्शन कमी वयात पाहिलं आणि जगलोही होतो . थोडं समाजभान येऊ लागलेल्या अगतिकतेच्या टप्प्यात राजकीय भूमिकेचे महत्वही प्रकर्षाने जाणवले होते . याच जाणिवेने यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत कार्यक्षम उमेदवारांना प्रत्यक्ष सोबत उतरून बळ देण्याचा निर्धार मी आणि माझ्या समविचारी साथीदारांनी केला होता . मात्र प्रत्यक्ष गावातील राजकीय वातावरणाचा , उमेदवारांचा , गटा तटांचा अंदाज घेतल्यानंतर मनात खूपच घालमेल सुरू झाली . निवडणुकीची पद्धती खूपच अलबेल दिसत होती . विश्वासू , अभ्यासू अन कार्यक्षम नेतृत्व दिसत नव्हते . भावना विवंश होऊन मी , अतुल , सूर्यभान आणि इतर साथीदार सतत यावर बोलत होतो . हे चित्र बदलायला हवं या निष्कर्षापर्यंत येत होतो . आपल्याला बरं - वाईट कळत असताना समोर चुकीचं घडतंय हे दिसत असताना आपण गप्प कसे बसू शकतो ? या प्रश्नाने आम्ही खडबडून जागे झालो . मग ठरलं बदलाची सुरुवात स्वतःपासून . आपण निवडणूक लढवायची , लोकांच्या समोर जायचं , त्यांना सक्षम , अभ्यासू , कार्यक्षम नेतृत्वाची गरज पटवून द्यायची . आणि आमचं ठरलं . निवडणूक स्वाभिमानाने लढवायची , वर्षानुवर्षे चालत आलेली पारंपरिक , भावकी , जात , धर्म , लिंग , देव आणि व्यक्ती केंद्रित निवडणूक पध्दतीला छेद देत संविधानिक , मूल्याधिष्ठित , विकासानुरूप निवडणूक लढविण्याचा आम्ही निर्धार केला . निवडणुकीचा अर्ज स्वतःच ऑनलाईन पद्धतीने भरला . त्यानंतर मात्र गावात खळबळ सुरू झाली . एकीकडे गावची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी अट्टाहास बाळगून बसलेले पारंपरिक नेते , अर्थातच त्यामध्ये त्यांचा स्वार्थ दडलेलाच . तर दुसरीकडे पॅनल उभा करण्यासाठी ज्या उमेदवाराची भावकी अधिक असेल , पैसा खर्च करण्याची तयारी असेल अशा उमेदवारांच्या ? शोधात गावभर कसरत करणारे पारंपरिक लिंबू - टिंबू . अशातच आमचा निवडणूक लढविण्याचा निर्णय त्यांना सुखावणारा नव्हता .
मग " निवडणूक लढविणे शेंबड्या पोरांचं काम नव्हे , एवढे लाख तयार ठेवा , गुमान माघार घ्या , तुमची बघितली तर चार घरं अशा हिनावण्या आणि धमक्या देऊन झाल्या . तरीही पोरं हटतनाहीत म्हटल्यावर " एवढे तेवढे पैसे घ्या , कुणीतरी एकाने आमच्या पॅनलमध्ये या " अशा विनावण्याही झाल्या . या परिस्थितीत आमचा स्वतःवरचा विश्वास अधिकच दृढ होत गेला . • जिवलग मित्र अतुल आणि मी दोघांनी निवडणूक अर्ज कायम ठेवला . सामाजिक कार्यकर्ते म्हणून गावात असलेली थोडीफार मान्यता राजकीय नेतृत्वाच्या साच्यात परावर्तित करणे ही एक कसोटीच होती . ते आव्हान • आम्ही ' अपक्षपणे स्वीकारले . ' स्वाभिमानी ग्रामपरिवर्तन ' नावाने दोघांचंच पॅनल उभं राहिलं . नारळ न फोडता नारळाचे रोप लावून प्रचाराचा नारळ जपण्याचा वाढवण्याचा पर्यावरणवादी कार्यक्रम घेऊन प्रचाराला सुरुवात केली . एकीकडे घरातीलच आठ - दहा सदस्य सोबत घेऊन आमच्या प्रचाराच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली तर दुसरीकडे इतर पॅनलमधील उमेदवार अन पॅनलवाले शेकडोंची गर्दी जमवून प्रचार आरंभाची रॅली गावभर मिरवून शक्ती प्रदर्शन करत होते . आम्ही ठाम होतो . भलेही आज आठ - दहा लोक सोबत असतील पण माणूस बदलतो , आपण माणूसपणावरचा , विवेकावरचा विश्वास ढळू द्यायचा नाही , ही रोज मनाची समजूत घालत होतो . मग ग्रामविकासाचा जाहीरनामा मांडला . जलसंधारण , आरोग्य , शेती , शिक्षण हे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी • अत्यंत बारकाईने व सखोल योजना आखल्या . गावच्या विकासाचे भविष्य जाहिरनाम्याच्या रूपाने कागदावर उतरवले आणि जनतेच्या मनामनातही . लोकांना आमच्या कार्यक्षमतेचा अंदाज बांधता यावा म्हणून त्यांच्या उमेदवारांचे शिक्षण , सामाजिक आणि चळवळींच्या कार्यातील योगदान , राज्य - राष्ट्रीय स्तरावरील प्रतिनिधित्व आणि • अनुभव इत्यादी दाखले गावकऱ्यांसमोर मांडले . " तुमच्या उमेदवारांवर व त्यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास दाखवा आम्ही तो सार्थ ठरवू " अशी भावनिक सादही घातली . जाहीरनामा घेऊन किमान बारा ते पंधरा वेळा वार्डातील मतदारांना भेटलो . वडील मंडप व स्पिकर व्यावसायिक असल्याने अगदी लहानपणीच कामानिमित्ताने माईक हातात पडला . गावात कुठेही लग्न , बारसे किंवा इतर कोणताही कार्यक्रम असला की संपूर्ण गावाला माईकवर निमंत्रण देण्याचे काम करत आलो होतो . आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःला जाहीर करायला माईक हाती घेतला . मीच माझा कार्यकर्ता होतो , इतर उमेदवारांसारखी कार्यकर्त्यांची रेलचेल सोबतीला नव्हती . मग प्रचाराच्या गाडीवर बॅनर बांधायचा , प्रचाराची गाडी चालवायची , कोपरा बैठकीसाठी स्पिकर लावायचा आणि त्याच बैठकीत माझा जाहीरनामाही मीच मांडायचा , कार्यक्रम झाला की सगळं गुंडाळायचंही मीच . हा अनुभव मला समृद्ध करणारा होता . माझा मतदारवॉर्ड तसा लांबलचक विस्तारलेला . गावच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत . गावाच्या बहुतेक वाड्या - वस्त्या माझ्याच वॉर्डमध्ये असल्याने प्रचारासाठी भरपूर पायपीट करावी लागली . शेताच्या बांधापासून ते घरातल्या चुलीपर्यंत भेटणाऱ्या प्रत्येक गावकऱ्याला जीव तोडून सांगत होतो . अनेकांनी कौतुक केलं , मत देण्याचं आश्वासन दिलं तर काहींनी राजकारणात न उतरण्याचा सल्लाही . प्रचारादरम्यान जुन्या प्रतिनिधींच्या निष्क्रीयतेची पावलोपावली प्रचिती येत होती . कुणाला गॅस हवा होता , कुणाला घरकुल , कुणाला गोठा , कुणाला अडकलेले अनुदान , रस्ता , शुद्ध पाणी , हातपंप , मागासवर्गीय निधी , शेततळे , शेतापर्यंतचा रस्ता , आदी असंख्य प्रश्न समोर आल्यावर अक्षरशः गांगारून गेलो . इतकी वर्षे हे प्रश्न का सुटले नाहीत हाच विचार सतत मनाला छळत होता . गावातील म्होरक्यांच्या धाकाने , संबंध खराब होतील या भीतीने नागरिक सोबत यायला कचरायचे . या कठीण काळात माझे आई - वडील खंबीरपणे सोबत उभे राहिले . नितीन जाधव , शुभम गुरव , क्षितिजा देशमुख , अक्षता पानकर , आश्विनी पवार , ऋषिकेश पवार , अक्षय शिंदे यांसारखे TISS , APU , TDA आदी नामांकित शिक्षणसंस्थांमध्ये शिक्षण घेणारे मित्र - मैत्रिणी मतदारांना शहाणे करण्यासाठी घरोघरी फिरले . या समाजभानी लोकांच्या असण्याने निवडणूक पद्धतीला नैतिक महत्व प्राप्त झाले . गावच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणूकीसाठी सभेचे आयोजन आम्ही केले . सभेमध्ये पोटतिडकीने जाहीरनामा लोकांसमोर मांडला . जलसंधारणाशिवायचा विकास आराखडा जाहीर केला . ज्यात महिला आरोग्य , स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्ये , शिक्षण , पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त गावकारभार , जलसिंचनाचे महत्व व अनुदान , बंधारे दुरुस्ती , विद्यार्थ्यांना फ्री वाय - फाय , घरपोच कागदोपत्री सेवा , वित्त आयोग , आदी कृती आराखडा सांगितला . विरोधी उमेदवारांची निवडणूक लढविण्याची पध्दती मात्र अनैतिक होती . मताला एक ते पाच हजारांचा ( मतदारांची भुरळ क्षमता पाहून ) दर , निवडणूक होईपर्यंत ठरलेल्या धाब्यावर दारू अड्डयावर कार्यकर्ते अन मतदारांचा पाहुणचार , भावकी , जात , धर्म , आळी - गल्ली , आडनाव या अविवेकी मुद्यांच्या आधारे मतदारांनानिवडणूक कशी त्यांच्या प्रतिष्ठेची आहे हे रुजवणे , दुबळ्या नागरिकांना धमकावून , देवभोळेपणाचा फायदा घेऊन अमुक - तमुक देवांच्या शपथा घालून किंवा गुलाल - भंडारा उचलून पैसे देणे अन मतदारांना मतं द्यायला भाग पाडणं . यातून जिंकण्या - हरण्या पलीकडे संविधानिक व नैतिक पद्धतीने ग्रामपंचायत निवडणूक पार पडावी यासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळाली . महिलांसाठी राखीव आरक्षण नावाचा प्रकार जरी अस्तित्वात असला , तरी ' तिच्या ' प्रचारासाठी ' तिला ' बाहेर न पडू देणारी , तिला नामधारी पदप्रतिष्ठा देऊन नवरा , मुलगा , सासरा यांच्या ढुंगणाला आजवर चिकटलेली खुर्ची तिला आता मिळायला हवी . सोबत निर्णयस्वातंत्र्यही . जातीनिहाय वस्त्यांचे , वंचितांचे प्रश्न मला या निवडणुकीने कान धरून दाखवले . शेवटी ' माझ्या ' निवडणुकीचा निकाल लागला . मला चक्क १५६ मतं मिळाली होती . याचा अर्थ प्रत्यक्ष सोबत येऊ न शकलेल्या १५६ महिला , वृद्ध , तरुण - तरुणी अन गावकऱ्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला होता . अवघ्या ३६ मतांनी जरी मला निवडणूक प्रक्रियेत जिंकता आलं नाही तरीही गावकऱ्यांच्या मनात माझा , माझ्या साथीदारांचा , संविधानिक निवडणूक पद्धतीचा विजय झाला . यातून एक समजलं गावाकडच्या चुरगळलेल्या माणसांना शाश्वत उभं करायला आता खरोखरच कार्यक्षम अन अभ्यासू नेतृत्वाची गरज आहे . राजकारण हे घाणेरड्या अन नालायक लोकांचं क्षेत्र कधीच नव्हतं , नाही आणि नसेल . सूज्ञ नागरिकांच्या नेतृत्वाच्या अभावाने ते तसं बनलं आहे . गावाकडच्या साध्या - भोळ्या लोकांना आता बदल हवाय . मला या बदलाचा भाग व्हायचंय तुमच्या सोबतीने आमूलाग्र बदल घडू शकतो ... म्हणून लढूयात !! आणि जिंकूयात !! ~ सत्यजित सीमा सं ( 9561629202 )

0 Comments